मनोरंजन

हम ‘सात’ साथ है

सात जणांच्या जिद्दीतून साकारलेला 'द ऑफेंडर' १५ जूनला चित्रपटगृहात

जगाला काहीतरी वेगळे करून दाखवण्याची तळमळ प्रत्येक तरुणाला असते. याच तळमळीतून, चित्रपट क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नसताना अर्जुन महाजन, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे, दिनेश, अनिकेत, सोमनाथ, सुरज आणि शिवाजी या सात मित्रांनी ‘सावंतवाडी डेज…’ नावाचा एक लघुपट तयार केला आणि १३ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला पाठवला. मात्र महोत्सवात समीक्षकांकडून गौरविला गेलेला हा लघुपट काही तांत्रिक कारणामुळे थिएटर पर्यंत पोहोचू शकला नाही. इतके दिवस कसून केलेल्या मेहनतीवर पाणी पडणार? अशी परिस्थिती निर्माण झाली.

मात्र डोक्यातला विषय आणि आतापर्यंतचे श्रम या मंडळींना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे ‘आता आपण थेट चित्रपटच करू आणि ज्या थिएटरमध्ये ‘सावंतवाडी डेज’ लागला नाही त्याच थिएटर मध्ये लावून दाखवू,’ असा निर्धार या सगळ्यांनी केला. हे म्हणावं तितकं सोपं नव्हतं, पण तरी ही सगळी मंडळी नव्या जोमाने कामाला लागली आणि सलग ३ वर्षे अविरत मेहनत घेऊन ‘द ऑफेंडर’ – स्टोरी ऑफ अ क्रिमिनल’ हा मराठी सस्पेन्स थ्रिलर आकारास आला. सृजनतेचा ध्यास घेऊन अनेक अडथळय़ांची शर्यत ओलांडत पुढे जाणाऱ्या या ७ तरुणांच्या प्रयत्नांची कहाणी आता येत्या १५ जूनला  मराठी रुपेरी पडद्यावर साकार होणार आहे.

भीती, प्रेम, विश्वास यांचा संमिश्र अनुभव देणारा थरारपट म्हणजे ‘द ऑफेंडर’. या चित्रपटात अर्जुन महाजन, डॉ. अमित(श्रीराम) कांबळे, दिप्ती इनामदार, दिनेश पवार पाटील, अनिकेत सोनवणे, सुरज दहिरे, शिवाजी कापसे, सोमनाथ जगताप आणि लव्हनिस्ट हे कलाकार असून त्यांनी लेखनापासून दिग्दर्शनापर्यंतच्या सर्व भूमिका पार पाडण्याचं शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं आहे. मराठी चित्रपटांमध्ये अभावाने आढळणाऱ्या क्लायमॅक्स-ऍंटीक्लायमॅक्स, पॅरॅलल एडीट वगैरे पद्धती त्यांनी बेधडकपणे व आत्मविश्वासाने हाताळल्यामुळे चार आंतरराष्ट्रीय फेस्टीव्हल मध्ये गौरवलेला  ‘द ऑफेंडर’, या ७ तरुणांच्या विचारांचा आरसा ठरतो. चित्रपटक्षेत्रात पहिले पाऊल टाकताना त्यांनी केलेले काम निश्चितच वेगळे, उठावदार आणि आश्वासक आहे.

या चित्रपटाचे निर्माते श्री. एस्. एम्. महाजन आणि सौ. व्ही. आर. कांबळे असून संकलन-दिग्दर्शन आणि गीते अर्जुन महाजन यांची तर सहाय्यक दिग्दर्शन सोमनाथ जगताप यांचे आहे. चित्रपटाची कथा डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांची असून पटकथा व संवाद अर्जुन महाजन व डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी अनिकेत सोनवणे, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन सुरज दहिरे यांचे, ध्वनीमुद्रण दिनेश पवार यांचे असून निर्मीती व्यवस्थापन शिवाजी कापसे यांनी केलं आहे. संगीत आरोह, कृष्णा सुजीत यांनी दिले असून आरोह वेलणकर, स्वप्नील भानुशाली यांनी या चित्रपटातील २ गाणी गायली आहेत.

‘द ऑफेंडर’ १५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close