लोकभवन न्युज

विज्ञानवादी राष्ट्रसंत संत गाडगेबाबा

विज्ञानवादी राष्ट्रसंत संत गाडगेबाबा

विज्ञानवादी राष्ट्रसंत संत गाडगेबाबा संत गाडगे बाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी सेनगाव तालुका अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथे परीट समाजात झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर हे आपल्या लोककार्यामुळे कर्मयोगी गाडगे महाराज म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्याचे देण्याचे महान कार्य केले. ते नेहमी सांगत देवळात जाऊन नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका. अडाणी राहू नका. पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देव, चमत्कार यावर विश्वास ठेवू नका. अशी शिकवण आयुष्यभर देत असत. खर्च नका पैसे देवासाठी! शिक्षणाला पैसा तोच द्या हो!! नका मंदिराची कमवया भर ! छाज जो हुशार त्यास द्यावा!!नको धर्मकृत्य पैसा खर्चूनिया ! घेण्यासाठी विद्या तोच खर्चा !! शाळेहून थोर ते नाही मंदिर! देणगीदार उदार शाळेला द्या !! भक्तीचा प्रचार नाही श्रेयस्कर ! शिक्षण प्रचार सर्वश्रेष्ठ !! गरिबांनी तरी फेकावा विश्वास! देवाजीची आस पूर्ण खोटी!! नसलेले देव कोठून येणार! कल्याण होणार कधी सांगा!! स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने! शक्तीने, युक्तीने सुखी व्हावे !! गाडगेबाबा तीस वर्ष पंढरपूरला आषाढी कार्तिकीला गेले पण एकदाही देवळात गेले नाहीत. एकदाही आषाढी-कार्तिकीचा उपवास केला नाही. लोकांनी घाण केलेला चंद्रभागेचा किनारा स्वतःच्या झाडूने साफ करायचे. संध्याकाळी कीर्तनाला उभे राहायचे. समोर हजारो माणसे असायची आणि बाबा त्यांना विचारायचे देव पाहिला का? देव? लोकांना वाटायचे अरे आम्ही पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला आलोय आणि हा आम्हाला विचारतोय देव पाहिला का? देव? लोक म्हणायचे पाहीला जी. बाबा म्हणायचे कमाल आहे? तुमचा देव कोठे राहतो? लोकांना वाटायचे याला काहीच माहित नाही. तेव्हा ते म्हणायचे अरे आमचा देव देवळात राहतो, रंगाने सावळा आहे, त्याचे कटीवर हात आहेत. त्याच्या बाजूला रखमाई उभी आहे. बाबा म्हणायचे कमाल आहे? तुमचा देव देवळात राहतो. माझा देव माझ्या मनात राहतो. तरी लोकांना काही कळत नसायचं. मग ते आपल्या मिस्कील वर्‍हाडी शैलीत म्हणायचे तुम्हाला देवाला आंघोळ करते का नाही? लोक म्हणायचे करते तर. बाबा म्हणायचे तुम्हाला देवाला अंघोळ कोण घालते? लोक म्हणायचे आम्हीच घालतो जी. बाबा म्हणायचे अरे तुमच्या देवाले स्वतःची आंघोळ स्वतःकरता येत नाही, तर तो तुम्हाला तुमच्या भाग्याची अंघोळ काय घालणार? मग बाबा म्हणायचे तुम्हाला तुमच्या देवाला धोतर नेसते का नाही? लोक म्हणायचे नेसते तर. बाबा म्हणायचे तुम्हाला देवाला धोतर कोण नेसवते लोक म्हणायचे आम्हीच नेसवतोजी. बाबा म्हणायचे अरे तुमच्या देवाला स्वतःच्या नेसूचे धोतर नेसता येत नाही. तो तुम्हाला तुमच्या भाग्याचे वस्त्र काय देणार? पुढे बाबा विचारायचे तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवते की नाही? लोक म्हणायचे दाखवते. बाबा म्हणायचे दाखवून काय करते? त्याच्या बाजूला काठी घेऊन बसते. बाबा विचारायचे कशाला? देवाला वाढलेल्या नेवेद्य कावळा, कुत्रा आला तर त्याला हाकलायला. बाबा म्हणायचे अरे जे तुमच्या देवाला त्याच्यासाठी वाढलेल्या नैवेद्याचं रक्षण करता येत नाही ते तुमच्या आयुष्यात संरक्षण काय करणार? आणि पुढे बाबा एक लाख मोलाचा प्रश्न विचारायचे जिता जागता देव कोणी पाहिला का? मग लोक कावर्‍या बावर्‍या बघायचे गाडगेबाबांच्या बाजूला एक माणूस उभा असायचा रापलेला चेहरा, जाडेभरडे खादीचे कपडे, पांढरीशुभ्र दाढी, अनवाणी पाय त्यांच्याकडे बोट दाखवत बाबा म्हणायचे अरे हे भाऊराव पाटील बघा हे महारा मांगाच्या पोराला शिकवण्याचं काम करते ते त्याला देव म्हणा. अरे ते गाडगेबाबा बघा ते देशासाठी मरमर मरते त्याला देव म्हणा. अरे अडाण्याला शिक्षण द्यावे, रंजल्या गांजलेल्यांची सेवा करावी, मुक्या प्राण्यांवर दया करावी, बापहो देव यांच्यात राहतो. बापहो देव देवळात राहत नाही. देव मनात राहतो. बापहो देवळात फक्त पुजार्‍याचं पोट राहते. देव कोणाला दिसला नाही. तो कुणाला दिसणार नाही. मग तो दिसतच नाही त्यासाठी एवढा आटापिटा करण्याची गरजच काय? गाडगेबाबा संत तुकारामांचा पुरावा देत मनात देव पहावयास गेलो अन् तेथे देव होवोनी ठेलो.तीर्थ यात्रेला जाणार्‍या लोकांना गाडगेबाबा सांगत- तीर्थाला जा, पैशांचा नाश, जगन्नाथ, रामेश्वर हे सर्व पोट भरण्याचे देव आहेत. देव देव करता शिनले माझे मन! पाणी आणि पाषाण जेथे जेथे!! गाडगेबाबा यांनी कबीराच्या भाषेत लोकांना सांगितले *जत्रामें फतरा बिठाया, तीरथ बनाया पाणी! दुनिया भरी दीवानी, पैसे की धूल धानी!!* कीर्तनातून गाडगेबाबा नेहमी सांगत *दगडाचा देव बोलीत तो कैसा! कवन काळी वाचा फुटेल त्यासी!!* व्यसनमुक्तीच्या संदर्भात एकदा गाडगेबाबा वर्धा जिल्ह्यात असताना गांधीजीच्या निमंत्रणावरून त्यांना भेटण्यासाठी ते सेवाग्राम येथे गेले. आसपासच्या लोकांना गाडगेबाबा सेवाग्रामला आल्याची बातमी समजली प्रचंड जनसमुदाय जमा झाला. गांधीजीच्या सांगण्यावरून गाडगेबाबांनी तिथे कीर्तन केले. गाडगेबाबांची लोकप्रियता आणि सरळ स्वभाव पाहून महात्मा गांधी मंत्रमुग्ध होऊन गेले. हा स्वच्छ अंतः करणाचा संत गांधीजींना प्रभावित करून गेला. महात्मा गांधीने संत गाडगे बाबाना विचारले आपली प्रॉपर्टी किती? बाबा म्हणाले काही नाही फक्त एक काठी, गाडगे व गोधडी माझी आहे. मृत्यूनंतर तीही जनतेच्या हवाली महात्मा गांधी म्हणाले *मैने आज तक ऐसा सच्चा संत देखा नही, बाबा आप एकीही महान निर्मोही संत हो! * असे म्हणून गांधीजीने गाडगे महाराजांच्या पायावर डोके ठेवले.संत गाडगेबाबांचा पत्रव्यवहार फार मोठा होता. स्वतः त्यांना लिहिता येत नव्हते, तरी त्यांची बुद्धी अतिशय तरल होती. कुठलेही संदर्भ पत्ते त्यांच्या स्मरणात राहात. त्यांच्यासोबत सदैव असणार्‍या वहीत ते पत्ते उतरवून घेतलेले असत.पण बहुतांश पत्रकारलेखकाला क्वचितच त्यांचा उपयोग करावा लागत असे. संत गाडगेबाबा तोंडीच भरभर ते पत्ते सांगत असत. ही सगळी पत्रे त्यांनी लिहून घेतली होती. पत्र त्यांना देखणे असे हवे असे.वाटेल तसले घाणेरडे वाचता न येणारे अक्षर त्यांना अजिबात आवडत नसे.पञ लेखकाला बारीक टोक असलेले निब आणि टोक बरोबर वागवावा लागे, स्वतः कोणालाही पत्र लिहिताना मायना अति आदरपूर्वक लिहिलेला त्यांना हवा असे.जसे श्रीमंत, दानशूर, कर्णासारखे उदार, साहेब यांस गाडगेबाबांचे अनंत कोटि नमस्कार,पत्रास कारण की, असे त्यांचे पत्र सुरू होई.त्यांचे त्यागी नाभिक आणि त्यास देखील अनंत कोटि नमस्कार केवळ वरील विशेष नात बदल होईल.ह.भ. महाभक्त, लोकसेवक, दानशूर अशी आभूषणे त्यामागे जोडली जात. त्यांचे अनुयायी त्यापैकी कित्येक तर वयाने त्यांच्या नातवाऐवढे असत. पण त्यांनाही पत्र लिहिताना महाराज बाबा अशी सुरुवात करीत. असे संत गाडगेबाबा क्रांतिकारक होते पण त्यांना कोणी साधू संत महाराज म्हटलेले खपत नसे. संतांविषयी त्यांना अपार आदर. संत कोणाला म्हणावे यावर अनेक पूर्व संतांचेच दाखले देऊन ते प्रवचन करू लागले म्हणजे त्यांची रसवंती विलक्षण प्रेमादराने नाचू लागे. कुठे ज्ञानोबा, तुकाराम, एकनाथ, कबीरांसारखे मोठमोठे संत आणि कुठे मी? कोणत्या झाडाचा पाला? ही कबुली त्यांच्या प्रत्येक कीर्तनात असे. देवकोटी किंवा संतकोटीपेक्षा साध्यासुध्या मानवकोटीचेच जिणे पत्करून मानवतेची कटृर सेवा केली. संत गाडगेबाबांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी जनतेला साक्षरतेचा, साक्षेपाचा, अखंड उद्योगाचा सहकाराचा आणि काटकसरीचा अट्टाहासी उपदेश केला. सावकारशाहीच्या नी भांडवलशाहीच्या कचाट्यात चुकूनही न जाण्याचा इशारा दिला. माणुसकीला बदनाम करणार्‍या रुढी, रिवाज देवकार्य यांच्यापासून दूर राहण्याचा उपदेश दिला. संत गाडगेबाबांच्या 45 वर्षांच्या प्रचार कार्यातले मुद्दे लक्षात घेतले तर त्यांना समाजवादी सत्यशोधक म्हणायलाही काही हरकत नाही.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांचे अतूट संबंध होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या बहुजनांच्या चळवळीला गाडगे बाबांनी केवळ पाठिंबा दिला नाही तर आपल्या कीर्तनातून जातीयतेच्या अस्पृश्यतेचा लोकांच्या मनात असलेल्या खुळ्या कल्पनांचे खंडन करून त्यां नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्यतेच्या विरोधात ते जीवनभर लढले. गाडगेबाबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अतीव आदर होता. पंढरपूर येथील मठ त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण संस्थेसाठी दिला. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील हेही उपस्थित होते. बहुजनांच्या शिक्षणासाठी कार्य करणार्‍या रत्नांचा तो महान संगम ज्यांनी याची देही याची डोळा पाहिला ते खरोखरच धन्य होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. ही बातमी समजताच संत गाडगे बाबांनी आपल्या घराचे दार बंद केले व अन्नपाणी सोडून दिले.डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाचे दुःख सहन न झालेल्या संत गाडगेबाबांनीही 14 दिवसात म्हणजे 20 डिसेंबर 1956 रोजी आपला देह सोडला.अशी निष्ठा, जिव्हाळा, आदर, प्रेम व अशा महान कार्याची समाजाला नितांत गरज आहे.अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड यावर प्रहार करणारे दोन्ही महामानव लागोपाठ एकाच महिन्यात गेले. सामाजिक कार्याला खीळ बसली. 5 – मे 1923 रोजी गाडगे महाराज यांचा मुलगा गोविंद मरण पावला. खारेपाटण रत्नागिरी येथे महाराजांचे कीर्तन सुरू होते. कीर्तनात त्यांना ही वार्ता समजली. महाराज एक मिनिट शांत झाले आणि म्हणाले * मेले असे कोट्यानुकोटी काय रडू एकासाठी * असे म्हणणारे संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्युनंतर मात्र टाहो फोडून रडतात आणि शेवटी 14 दिवस अन्नपाणी सोडून देऊन 20 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड जातात. त्यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!

  • एस.एन. गच्चे

  • जि.प.प्रा.शाळा लिंबोणी

  • ता.घनसावंगी जि. जालना

  • मोबाईल नंबर -8275390410/ 8007050036

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close