क्राईम रिपोर्टरराष्ट्रीय

या दहशतवाद्याने घडवला हल्ला

या दहशतवाद्याने घडवला हल्ला

 

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवल्याची माहिती समोर येत आहे.
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे सीआरपीएफचा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला जात होता. या ताफ्यात 25 बस होत्या. सुमारे अडीच हजार जवान या ताफ्यात होते. अवंतीपोरा येथे महामार्गावर स्फोटाने भरलेल्या कारने दोन बसला धडक दिली. या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हल्ल्याच्या काही वेळानंतरच पाकिस्तानमधील जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल हा 2016 नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. बुरहान वानी या दहशतवाद्याला 2016 सैन्याने कंठस्नान घातले होते. त्याच्या मृत्यूनंतर जम्मू- काश्मीरमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारानंतर स्थानिक तरुणांचे दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे प्रमाण वाढले होते. आदिल दार हा देखील याच सुमारास दहशतवादी संघटनेत सामील झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या तीन वर्षांमधील उरीनंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथे लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते.
हल्ल्यानंतर सोशल मीडियावर आदिलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आदिलने ‘लवकरच विजय मिळणार, इन्शा अल्लाह!’, असे म्हटले आहे. आदिल हा पुलवामा येथील रहिवासी असल्याचे समजते.

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close