स्पोर्ट्स

भारत-श्रीलंका युवा कसोटी : पुण्याच्या पनव शाहने रचला विक्रम

श्रीलंका अंडर-१९ संघाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवशी पवन शाह याने २८२ धावांची द्विशतकी खेळी साकारली. पवन शाहने आपल्या खेळीत ३३२ चेंडूंना सामोरे जाताना ३३ चौकार व एक षटकार खेचला. याबरोबरच त्याने १२ वर्षांपूर्वीचा भारतीय फलंदाजाचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. हा विक्रम उत्तर प्रदेशच्या तन्मय श्रीवास्तव याच्या नावावर होता. त्याने इंडिया अंडर १९ मधून खेळताना २००६ मध्ये पाकिस्तान अंडर १९ संघाविरुद्ध पेशावरमध्ये २२० धावांची खेळी साकारली होती.

पवनने अंडर १९ मध्ये दुसर्‍या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या रचली. युवा क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांसंख्ये मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लिंटन पिके अव्वलस्थानी आहे. त्याने भारत अंडर १९ विरुद्ध मेलबोर्नमध्ये १९९५ साली नाबाद ३०४ धावा काढल्या आहेत.

एकाच षटकात सहा चौकार

पवनने  श्रीलंकेच्या के. के. व्ही. परेरा याच्या एकाच षटकात सहा चौकारही ठोकले. तसेच त्याने आपले ड्विशतक चौकार मारून साजरे केले.

भारतीय संघाने उभारला धावांचा डोंगर
 
पहिल्या दिवशी अथर्व तायडेने १७७ धावांची जबरदस्त खेळी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पवन शहाने  २८२ धावांची दमदार खेळी केली. भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघातील गोलंदाजांची पिसे काढली. भारताच्या १९ वर्षांखालील संघाने दुसर्‍या चारदिवसीय युवा कसोटीत ८ बाद ६१३ धावांचा डोंगर उभारला. तर याला उत्तर देताना श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघाने दुसर्‍या दिवसअखेरीस ४ बाद १४०  धावा केल्या असून आता त्यांचा संघ ४७३ धावांनी पिछाडीवर आहे.
Show More
Contact Person WhatsApp us
Close