पुणेव्‍यापार

पुण्याला सिलेंडरमुक्त करण्याचा ’एमएनजीएल’चा निर्धर

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक राजेश पांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे : पुण्याला सिलेंडर मुक्त करण्याचा ‘एमएनजीएल’ चा निर्धार असून भारतात 2020 पर्यंत 2 कोटी घरांपर्यंत पोचण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे, अशी माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एम.एन.जी.एल.)चे संचालक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली .

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, एमएनजीएल’चे संचालक संतोष सोनटक्के उपस्थित होते. नैसर्गिक गॅस ची माहिती देणार्‍या विशेषांकाचे गिरीश बापट, अनिल शिरोळे, राजेश पांडे, संतोष सोनटक्के, सुहास पटवर्धन यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

राजेश पांडे म्हणाले ,’पुण्यात घरोघरी पाईप द्वारे गॅस देण्याचे नियोजन केले जात असून प्रशासकीय अडचणी न आल्यास पुणे शहराला दीड वर्षात ’सिलेंडर मुक्त’ करू . 2020 पर्यंत 2 कोटी घरांपर्यंत पोचण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. देशात 22 नोव्हेंबर पासून 100 जिह्यात काम सुरु होत आहे. त्यातील 4 जिल्हे एमएनजीएल कडे देण्यात आले आहेत. हा गॅस नैसर्गिक ,सुरक्षित ,स्वच्छ ,स्वस्त असून सहज उपलब्ध आहे. फक्त 500 रुपये भरून हा गॅस सोसायट्यातील घरांना मिळू शकतो. 5 हजार डिपॉझिट टप्प्याटप्प्याने मासिक 250 प्रमाणे भरून उपलब्ध होऊ शकतो. उर्वरित बिल गॅस प्रत्येकाच्या वापराप्रमाणे येईल . पुणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी या गॅस चा उपयोग घरे, उद्योग आणि वाहनांना करता येणार आहे.

सोसायट्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून नैसर्गिक गॅस आणि एमएनजीएल च्या योजनांची माहिती असणारा विशेषांक 16 हजार गृहनिर्माण संस्थांपर्यंत दिवाळीत पोहोचविला जाणार आहे, त्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाची मदत घेण्यात आली आहे ,असेही पांडे यांनी सांगितले.

बापट म्हणाले ,’पालिका पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी अधिकारी ,लोक प्रतिनिधी आणि एमएनजीएल चे संचालक यांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर पाठपुराव्याची व्यवस्था एमएनजीएल ने तयार करावी. आता दीड लाख घरात पोहोचलेला नैसर्गिक गॅस वर्षभरात अडीच लाख घरात गेला पाहिजे.

शिरोळे म्हणाले ,’शहरात एमएनजीएल पाइपसाठी खोदाईचे काम पूर्ण होत आले असून, सर्व कनेक्शन लवकरात लवकर देणे आता शक्य आहे.

Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close