पुणे

काचबिंदूमुळे होणारे अंधत्व रोखण्यासाठी नियमित तपासण्यांबाबत जागरूकता महत्त्वाची : तज्ञांचे मत

वर्ल्ड ग्लाऊकोमा वीक : 10 ते 16 मार्च 2019

वर्ल्ड ग्लाऊकोमा वीक : 10 ते 16 मार्च 2019

काचबिंदूमुळे होणारे अंधत्व रोखण्यासाठी नियमित तपासण्यांबाबत जागरूकता महत्त्वाची : तज्ञांचे मत

पुणे : काचबिंदूवर वेळीच उपचार न केल्यास अंधत्वाची जोखीम निर्माण होऊ शकते आणि म्हणून आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे,असे मत एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलमधील काचबिंदू सल्लागार डॉ.विद्या चेलेरकर यांनी व्यक्त केले.

काचबिंदू जगातील अंधत्वाचे दुसरे महत्वाचे कारण आहे. ज्यामुळे जगातील 8% लोक अंध आहेत. भारतामध्ये या आजारामुळे 12 दशलक्ष लोक बाधित आहेत. त्यातील 1.2 दशलक्ष लोकांना अंधत्व आलेले आहे.समुदायातील 90 टक्के लोकांमध्ये काचबिंदू चे निदान केले जात नसल्याने भारतामध्ये ही परिस्थिती उद्भवली आहे.याचे मुख्य कारण म्हणजे समुदायातील काचबिंदू बाबत जागरूकतेचा अभाव किंवा गैरसमज.

डॉ.विद्या चेलेरकर पुढे म्हणाल्या की,काचबिंदूशी निगडीत जोखमीच्या घटकांकडे यामध्ये 40 वर्षापुढील असलेले वय,कुटुंबात काचबिंदूचा असलेला इतिहास,जास्त प्लस किंवा मायनस असलेला चष्म्याचा नंबर,स्टिरॉईड औषधे किंवा डोळ्यांना अपघातामुळे झालेली इजा यांचा समावेश आहे.यात सर्वांत मोठे आव्हान म्हणजे काचबिंदूची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत.डोळ्यांचे दृष्टीक्षेत्र दोन्ही बाजूने कमी-कमी होत जाणे ही पहिली लक्षणे असून ते अगदी नंतरच्या टप्प्यात दिसून येतात.त्यामुळे नेत्रतज्ञांकडून प्रत्येक 1 ते 2 वर्षांत डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

त्या पुढे म्हणाल्या की,काचबिंदू होण्यापासून आपल्याला थांबविता येत नाही पण,वेळीच निदान व उपचार केल्यास आपण त्याला नियंत्रणात ठेऊ शकतो.लवकर उपचार झाल्यास काचबिंदूच्या प्रगतीचा वेग आपण कमी करू शकतो.म्हणूनच काचबिंदूने ग्रस्त असलेले रूग्ण जे नियमितपणे उपचार घेतात तसेच डोळ्यांची नियमित तपासणी करून घेतात त्यांना सहसा अंधत्व येत नाही.

काचबिंदूविषयी माहिती :

काचबिंदू हा एक स्वतंत्र रोग नसून तो रोगांचा गट आहे, ज्यामध्ये डोळ्यात असलेल्या द्रव्याचा दाब वाढून नेत्रचेतेला असाध्य नुकसान होते, जे नुकसान वेळेवर उपचार न झाल्यास भरून न येता कायम स्वरूपी अंधत्व देऊ शकते.

नेत्रजलाची उत्पत्ती डोळ्यांतील गोलाकार काळया चकातीच्या मागील पोकळीत होते. तिथून ते पुढील पोकळीत येते हे द्रव्य डोळ्यांच्या आतील रचनांना पोषण देते व ट्रॅबेक्यूलर मेशवर्क नामक जाळीतून बाहेर जाते. सर्वसामान्य अवस्थेत डोळ्याचा दाब 15 – 20 मिमी पार्‍या पर्यंत असतो. वरील कुठल्याही जागी काही दोष निर्माण झाल्यास दाब वाढू लागतो व नेत्रचेतेला नुकसान होऊन नजरेवर परिणाम होतो. ह्यालाच काचबिंदू असे म्हणतात.

काचबिंदू चे प्रकार:

1) प्रायमरी ओपन अँगल ग्लाऊकोमा

2) प्रायमरी अँगल क्लोजर ग्लाऊकोमा

3) डेव्हलपमेंटल ग्लाऊकोमा: जन्मजात प्रकार

4) सेकंडरी ग्लाऊकोमा : गौण प्रकार

लक्षणे

काचबिंदू हा हळू हळू वाढणार आजार असल्याने याची कुठली ठळक लक्षणे आढळून येत नाहीत. तुमचे डोळे अगदी निरोगी दिसू शकतात परंतु तुम्हाला कदाचित गंभीर प्रकारचा काचबिंदूचा विकार असू शकतो.चष्म्याचा नंबर वारंवार बदलावा लागणे, वाचन, लेखन वगैरे जवळची कामे करण्यास कष्ट पडणे आणि दृष्टिक्षेत्र हळूहळू कमीकमी होत जाणे ही लक्षणे असतात. समोर पाहिले असता स्पष्ट दिसते पण बाजूची दृष्टी कमीकमी होत जाते. पण अँगल क्लोजर ग्लाऊकोमामध्ये किंवा अचानक वाढलेल्या दाबामुळे काही रुग्णांमध्ये पुढील लक्षणे दिसून येतात.

1) डोळ्यांमध्ये अधून मधून वेदना व डोकेदुखी जी अंधारात किंवा जवळचे काम केल्यावर जास्त वाढते.

2) अंधुक दृष्टी

3) दिव्यांभोवती वलये दिसणे

4) डोळे अचानक लाल होणे

गौण प्रकार: बहुधा डोळ्यांला झालेल्या इजेमुळे, रक्तस्त्राव झाल्यामुळे अथवा डोळ्यांच्या काही भागांच्या विकृतीमुळे हा प्रकार उत्पन्न होतो .दीर्घ काळ दमा, संधिवात यासाठी स्टेरॉइड्स घेतल्यास देखील काचबिंदूची शक्यता वाढते.

जन्मजात प्रकार: भ्रूणावस्थेत (प्रसूतिपूर्व अवस्थेतील बालजीवाच्या अवस्थेत) डोळयांची रचना नीट झाली नसल्यामुळे हा प्रकार दिसतो .यात डोळा व बुब्बुळ मोठे होते. यावर त्वरित उपचार न केल्यास बालकाला लहानपणीच अंधत्व येण्याची शक्यता असते. या आजारात डोळ्याचे वजन वाढते व डोळ्याच्या मागे असलेली नेत्रचेता अर्थात ऑप्टिक नर्व्ह अशक्त होत जाते. डोळ्यांना रक्तपुरवठा कमी होत जातो आणि दृष्टी क्षीण होते

काचबिंदू निर्माण करणारे काही धोक्याचे घटक

* डोळ्यांचा वाढलेला दाब

*वाढत्या वयाबरोबर धोका वाढतो

*अनुवंशिकता काचबिंदूचा कौटुंबिक इतिहास असल्यास

*डोळ्यांना मार लागल्यास

*मधुमेह

*चष्म्याचा मोठा नंबर

*स्टिरॉइडचे अधिक काळासाठी सेवन

काचबिंदू चे निदान खालील तपासणी द्वारे करता येते

1) व्हिजन : नजरेचा तपास

2) टोनोमेट्री- याद्वारे डोळ्यांचा दाब मोजता येतो.

3) गोनिओस्कोपी- याद्वारे डोळ्यातील अँगल तपासता येतो.

4) ऑप्टिक डिस्कची तपासणी- लेन्स व ओसीटी द्वारे.

5) पेरिमेट्रीची तपासणी- याद्वारे दृष्टी क्षेत्र मोजता येते.

6) पॅकीमेट्री – बुबुळांची जाडी मोजणे.

 उपचार

नियमित डोळे तपासणी करणे हाच काचबिंदूवरील सर्वोत्तम उपचार आहे.

1) काचबिंदू मध्ये डोळ्यातील दाब कमी करण्यासाठी डॉक्टरांतर्फे ड्रॉप्स दिले जातात जे शक्यतो रुग्णास आयुष्यभर वापरावे लागतात.

2) काही रुग्णांमध्ये लेझर द्वारे उपचार करून डोळ्यातील द्रव्य बाहेर पडण्यासाठी कृत्रिम मार्ग तयार केला जातो व दाब कमी करता येतो.

3) ज्या रुग्णांमध्ये ड्रॉप्स व लेझर मुळे दाब कमी होत नाही त्यांच्यासाठी शस्त्रक्रियेचा उपाय उपलब्ध आहे.

4) सध्या नवीन आलेल्या उपचार पद्धती मध्ये एस एल टी लेझर, शंट सर्जरी, वाल्ह्व सर्जरी देखील करता येऊ शकते.

काचबिंदू मध्ये कुठल्याही उपचारांनी गेलेली नजर परत मिळवता येत नाही,म्हणून लवकर निदान व उपचार हेच केवळ काचबिंदूला तुमची नजर हिरावण्यापासून रोखू शकते. काचबिंदू नियंत्रणात ठेवता येतो त्यासाठी डॉक्टर सांगतील तसे नियमितपणे फेरतपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.

Tags
Show More

Related Articles

Contact Person WhatsApp us
Close